| श्रीगोंदा : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगले पाहिजे. अन्यायाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उचलली, तर जनतेवर अन्याय होऊ नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून न्यायाचा मार्ग दिला. समाजप्रबोधनासाठी बारवकर कुटुंबीयांनी आयोजित केलेला हा उपक्रम महापुरुषांचे ऋण फेडण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाची इतिहासात नोंद होईल असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार विजय चव्हाण यांनी केले आहे..
ढोकराई मळा, वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथे लोकशाही दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त गुरुवारी दि. २४ रोजी जाहीर प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. बापुराव बारवकर कुटुंबीयांच्या वतीने आयोजित केला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात लता सावंत तसेच विविध वक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्रीकृष्ण मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत संविधानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाच्या हातात पेन दिले आणि शिक्षण व ज्ञानाला परिवर्तनाचे प्रभावी साधन बनवले. भारतीय संविधान हा केवळ कायद्यांचा ग्रंथ नसून तो समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा मार्ग दाखवणारा राष्ट्रीय ग्रंथ आहे.
संविधानामुळे महिलांना मिळालेले अधिकार, पूर्वीची महिलांची सामाजिक परिस्थिती, संविधानाची उद्देशिका आणि नागरिकांची कर्तव्ये याबाबत मोरे यांनी मार्गदर्शन केले. “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे साध्य करायचे असेल तर दररोज संविधानाचे एखादे पान वाचले पाहिजे, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीकृष्ण मोरे त्यांनी केले.

तर डॉ. रफीक सय्यद यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरे विचारून उपस्थितांचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास त्यांना प्रत्येकी शंभर रुपये बक्षीस देण्यात आले. या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथावर प्रकाश टाकत उपस्थितांना त्यातील विचारांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयटी इंजिनिअर अमृता हनुमंत बारवकर यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली, याची माहिती त्यांनी दिली. तसेच लोकशाही दिन म्हणजे केवळ मतदानाचा अधिकार बजावणे नव्हे, तर मतदानानंतरही नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत ॲड. संभाजी बोरुडे यांनी केले.
या दरम्यान दौंड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार विजय चव्हाण यांच्या मातोश्री सुलोचना वामन चव्हाण तसेच श्रीगोंदा तालुक्यातील संगीता खामकर यांच्या निधनाबद्दल कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला मुकुंद सोनटक्के, डॉ. राजेश पाखरे, भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष उबाळे सर, बौद्धचार्य भारत आल्हाट, सत्यशोधक विधिकार भीमराव कोथिंबीरे, शहाजी कोरडकर, रफीक इनामदार, गुलाबभाई शेख, भागचंद्र शेलार, ॲड महेंद्र शिंदे, ॲड विनोद, उजगरे, ॲड बापू कांबळे, उपसरपंच महेश जाधव, गीतकार मंदाबाई जावळे, यशोदा भारती, पत्रकार अक्षय देवडे, सुमित रणधीर महेंद्र रणधीर श्रीगोंदाचे राजू आवटे, लांडगे महाराज, भिवाजी वीरकर, प्रकाश पाचपुते, गंगाराम कोकाटे, उत्तम घोडके, अण्णा शिंदे, बबन दांडेकर यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

