| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठी
यावेळी बोलताना राहुलकुमार अवचट म्हणाले की, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ ची प्रभावी अंमलबजावणी सर्व शासकीय कार्यालयांनी केल्यास माहिती अधिकाराच्या अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. शासकीय कामकाजात पारदर्शकता व गती निर्माण करण्यासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा असून, नागरिकांना त्यांच्या अधिकाराची माहिती होण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक आहे असे वक्तव्य अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म राहुलकुमार अवचट यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त दौंड पंचायत समितीच्या वतीने सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या स्वर्गीय बाबुराव कुल सभागृहात विशेष मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सभापती सुखदेव चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गटविकास अधिकारी अरुण मरभळ, माहिती अधिकार कार्यकर्ते जयदीप बगाडे, अमर जोगदंड तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलकुमार अवचट उपस्थित होते.
ते बोलताना असे म्हणाले की, अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अद्याप माहिती अधिकार अधिनियमातील कलम ४ (१) (ख) नुसार आवश्यक माहिती स्वयंस्फूर्तीने प्रसिद्ध केली जात नाही. ही माहिती नियमितपणे उपलब्ध करून दिल्यास माहिती अधिकाराच्या अर्जांमध्ये मोठी घट होऊ शकते. तसेच जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्ज प्राप्त झाल्यानंतर केवळ तीस दिवसांची मुदत न पाहता, शक्य तितक्या लवकर उपलब्ध माहिती देण्यासाठी कार्यवाही करावी. त्याचबरोबर जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे अवचट यांनी सांगितले.
तर दौंडचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ म्हणाले की, माहितीचा अधिकार हा पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासनासाठी महत्त्वाचा असून तो सक्षम लोकशाहीचा भक्कम आधार आहे. जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाकडील आवश्यक माहिती स्वयंस्फूर्तीने प्रसिद्ध केल्यास माहिती अधिकाराच्या अर्जांची संख्या निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माहिती अधिकार कार्यकर्ते जयदीप बगाडे यांनी माहिती अधिकार कायद्यासह विविध शासकीय निर्णयांची माहिती दिली. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रथमच दौंड पंचायत समितीत माहिती अधिकार दिन साजरा होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच नागरिक व पत्रकारांचाही अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सभापती सुखदेव चोरमले यांनी माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीसाठी उपयुक्त असून शासकीय कामांना गती देण्यासाठी त्याचा प्रभावी वापर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच कायद्याचा गैरवापर होतो का, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास सामान्य प्रशासन, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, पंचायत, आरोग्य, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास, बांधकाम आदी विभागांचे अधिकारी, विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पंचायत समितीच्या सामाजिक न्याय विभागाचे नाना मारकड यांनी केले. यावेळी त्यांनी माहिती अधिकार कायद्याची पार्श्वभूमी व उगम याबाबत माहिती दिली. सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

