| मंचर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
मंचर (ता. आंबेगाव) येथील दूध भेसळप्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, मंचर पोलिसांनी आणखी दहा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना मंगळवार (दि. ११) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.आता पर्यंत २४ जणांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात यापूर्वी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात आहेत. प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
मंचर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक २१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये संतोष बबन मोरे (४३, रा. शिरापूर, ता. पारनेर), दत्तात्रय रामदास भागवत (४१, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव), गणेश सुदाम पडवळ (४०, रा. सविंदणे, ता. शिरूर), आनंदा मारुती पवार (५६, रा. टाकळकरवाडी, ता. खेड), कुलदीप प्रकाश पवळे (३०, रा. चव्हाणमळा, ता. खेड), रविराज बबन थोरात (३२, रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव), राजेंद्र भगवान सिनलकर (४५, रा. लोणी, ता. आंबेगाव), ओंकार पोपट गिरवले (२८, रा. देवळगाव सिद्धी, ता. नगर), आशिष विठ्ठल लोंढे (३०, रा. लोंढेमळा, एकलहरे, ता. आंबेगाव) आणि सतीश महादू वाबळे (४७, रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे.
दूध भेसळ प्रकरणातील या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणामागील संपूर्ण साखळीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असल्याची माहिती मंचर पोलिसांनी दिली.

