| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यासह पुरंदर तालुक्यातील आदिवासी कल्याण व संवर्धन, महाराष्ट्र राज्य आणि आदिवासी कल्चर ॲन्ड सोशल ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट रोजी चिव्हेवाडी येथील आदिवासी पाड्यावर जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक संस्कृती, आदिवासी इतिहास, वनहक्क, शिक्षण आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात देवराई दिंडीने करण्यात आली. चिव्हेवाडी वाड्यापासून आदिवासी आदिमाता कातुरजाई देवी मंदिरापर्यंत देवराई दिंडी काढण्यात आली. पारंपरिक वाद्ये, आदिवासी पारंपरिक खेळ आणि जयघोषामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ‘हर हर महादेव’ आणि जय आदिवासी च्या घोषणांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला.
कातुरजाई देवी मंदिराच्या प्रांगणात आदिवासी पारंपरिक फेऱ्यांचा खेळ सादर करण्यात आला. आदिवासी माता कातुरजाई व मळाईदेवीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, कृष्णाजी साबळे, नाग्या कातकरी, तंट्यामामा भिल्ल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
पुरंदरच्या आदिवासी पूर्वजांचा इतिहास उजेडात
कार्यक्रमादरम्यान पुरंदर परिसरातील आदिवासी कोळी महादेव समाजाच्या इतिहासावर आणि योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. पुरंदर किल्ला परिसरात कोळी महादेव समाजाच्या अस्तित्वाचे पुरावे १२व्या शतकापासून तसेच त्यापूर्वीच्या काळापासून असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत कोळी महादेव समाजाने खांद्याला खांदा लावून योगदान दिल्याचे सांगण्यात आले. पुरंदर परिसरातील अनेक कुटुंबांकडे पूर्वी सरनाईक, पाटीलकी आणि देशमुखी यांसारख्या जबाबदाऱ्या असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. चिव्हे, साबळे, कोंडके, मिसाळ, ढगारे, कारकूड, यादव, चोरघे, निरावडे, पवार, नाईलकर, रांजणे आदी आडनावांचा यामध्ये उल्लेख करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या विविध क्रांतिकारी लढ्यांमध्ये पुरंदर परिसरातील आदिवासींचे योगदान अधोरेखित करताना क्रांतिकारक कृष्णाजी साबळे आणि त्यांचे पुत्र मारुती साबळे यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. भविष्यात पुरंदरच्या आदिवासी कोळी महादेव वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी शासकीय स्तरावर स्मारक उभारण्याचे नियोजन असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
वनहक्क, शिक्षण व आदिवासी योजनांबाबत मार्गदर्शन
आदिवासी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. वनहक्क, शिक्षण, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि समाजाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले आदिवासी समाजाचे नाते या प्रदर्शनातून अधोरेखित झाले.
कार्यक्रमास आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिवासी अविनाशजी ठोंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे सहकारी, पोलिस निरिक्षक खंडागळे (सासवड पोलिस स्टेशन), चिव्हेवाडीचे सरपंच दीपकजी चिव्हे, देवडीचे सरपंच निलेश यादव, मिसाळवाडीचे उपसरपंच उमेशजी मिसाळ, सदस्य बाळासो कोंडके, पोलिस निरीक्षक शशिकांत निरावडे, सायलीताई वाशिलकर, कल्यानीताई कोंडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला चिव्हेवाडी, मिसाळवाडी, देवडी, कोंडकेवाडी, बहिरवाडी, वेताळमाळ, पानवडी, रांजणवाडा, जेजुरी, नीरा, भोर, वेल्हा, जुन्नर,दौंड तालुक्यातील समज बांधव उपस्थित होते. सह्याद्रीतील डोंगर भागांमधून आदिवासी कोळी महादेव व डोंगर कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

