| हवेली : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

उरुळीकांचन ( ता. हवेली ) येथे दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे ग्रामीण युनिटने कारवाई करत एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते असा एकूण ५१ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.

ही कारवाई गुरुवार दि २७ ऑगस्ट  रोजी करण्यात आली. याप्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय माहिती संकलित करत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम व महेश गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

उरुळी कांचन – डाळिंब रोडवरील सदानंद बेकरी परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्टल बाळगून थांबली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी संशयित भाऊसो उर्फ भावड्या भगवान महाडिक (वय ३४, सध्या रा. डाळिंब रोड, खुडे वस्ती, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. शिंदवणे, ता. हवेली) याला पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते असा शस्त्रसाठा आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भाऊसो महाडिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी आयटीआय, बोरीभडक परिसरात पाच साथीदारांसह जमाव जमवून मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरण दौंड न्यायालयात सुरू आहे.

या गुन्ह्यातील त्याचा साथीदार शुभम उर्फ लल्या लोंढे याच्याविरुद्ध यापूर्वी उरुळीकांचन येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हत्यारे कशासाठी आणली होती?

आरोपीने गावठी पिस्टल, काडतुसे आणि कोयते नेमके कशासाठी आणले होते, त्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळीकांचन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, तसेच रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे आणि जालिंदर मुळीक यांच्या पथकाने केली.

दहशतवाद विरोधी शाखेकडून बेकायदा शस्त्र बाळगणारे, अंमली पदार्थांची विक्री करणारे तसेच समाजात दहशत व गुन्हेगारी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध यापुढेही प्रभावी कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *