|दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड, यवत आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या एकूण १९ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. हनुमंत बंडू उर्फ फोट्या काळे (वय अंदाजे ४०, रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
हनुमंत काळे हा आरोपी मागील दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता. त्याचे इतर साथीदार पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्याने मूळ गावी राक्षसवाडी येथे राहणे बंद केले होते. तसेच तो आपले नाव बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या दरम्यान, आरोपी हनुमंत काळे हा शिक्रापूर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, सहायक पोलीस फौजदार सचिन घाडगे, सहायक पोलीस फौजदार आसिफ शेख, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड आणि पोलीस हवालदार सुभाष राऊत यांनी सहभाग घेतला.
दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केल्याने घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे..
