| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त तसेच ‘महसूल दिना’चे औचित्य साधून शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ मंदिर परिसरात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरास परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील आगामी विकासकामांची माहिती दिली. महसूल व कृषी क्षेत्रातील नवीन कायदे, लोकाभिमुख सेवा आणि शासकीय योजनांची माहिती देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्या कालबद्ध नियोजन करून तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार अरुण शेलार यांनी शिबिराची पार्श्वभूमी मांडत उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी ‘महाराजस्व अभियान’ आणि नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांबाबत सविस्तर माहिती दिली.
या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. एकूण १,२७७ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप, विविध शासकीय दाखले व आदेश, प्रलंबित फेरफार व तडजोड प्रकरणांवरील आदेश, ॲग्री स्टॅक नोंदणी, कर्जमुक्तीची ई-केवायसी (e-KYC) तसेच विविध सामाजिक सहाय्य योजनांचा समावेश होता.
महसूल दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, महा-ई-सेवा केंद्र चालक, आशा सेविका, बीएलओ (BLO) आणि सुपरवायझर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
