| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
पुणे जिल्ह्यात गाजत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून अद्याप फरार असलेल्या १३ आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच भेसळयुक्त दूध स्वीकारून प्रक्रिया करणाऱ्या संबंधित दूध प्रकल्पांचीही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे केली.
यासंदर्भात देवदत्त निकम यांनी आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी दूध भेसळ प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण साखळीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. भेसळ करणाऱ्यांसह भेसळयुक्त दूध स्वीकारून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या संबंधित दूध प्रकल्पांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
देवदत्त निकम म्हणाले की, दूध भेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर अपराध आहे. त्यामुळे या प्रकरणातील कोणत्याही दोषीला अभय न देता सर्व संबंधितांवर कठोर, पारदर्शक आणि निष्पक्ष कारवाई करण्यात यावी.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विशाल वाबळे, शंकरराव टेमगिरे आणि विशाल भोर उपस्थित होते.

