| बारामती : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

आजच्या वेगवान आणि स्वार्थी मानल्या जाणाऱ्या युगातही प्रामाणिकपणा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी जपणारी माणसे समाजात आहेत, याचा प्रत्यय गुरुवार दि ११ रोजी बारामती शहरात घडलेल्या एका प्रेरणादायी घटनेतून आला आहे.

गौरी अनिल दाने (वय २६) आणि गौरव आसलकर हे दोघे अहिल्यानगर आगाराच्या एमएच १४ बीटी ३४९१ क्रमांकाच्या बसमधून प्रवास करत होते. फलटण बसस्थानक सोडल्यानंतर काही वेळाने त्यांना झोप लागली होती. जाग आल्यानंतर त्यांच्या सीटच्या मधोमध एक छोटे पाकीट पडलेले दिसले.

सदर पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये रोख ६ हजार रुपये तसेच सोन्याचे असल्याचा संशय असलेले दोन कानातील झुमके आढळून आले. अशा परिस्थितीत अनेकजण मोहापोटी वस्तू स्वतःकडे ठेवण्याचा विचार करतात. मात्र, गौरी दाने आणि गौरव आसलकर यांनी प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत हा मुद्देमाल बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वखुशीने जमा केला.

सदर मुद्देमालाचा खरा मालक शोधून त्यास योग्य खातरजमा करून परत मिळावा, या उदात्त हेतूने त्यांनी ही वस्तू पोलीसांच्या ताब्यात दिली. त्यांच्या या कृतीमुळे समाजातील नैतिक मूल्ये आणि परस्परांतील विश्वास आजही जिवंत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

या प्रामाणिक कृतीबद्दल बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी  गौरी दाने व गौरव आसलकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

तसेच नागरिकांनी सापडलेली मालमत्ता योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गौरी दाने आणि गौरव आसलकर यांनी दाखविलेली प्रामाणिकता ही केवळ एक कृती नसून समाजातील नैतिक मूल्यांचे जतन करणारा आदर्श असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशा सजग आणि प्रामाणिक नागरिकांमुळेच समाज अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुसंस्कृत बनत असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

बारामती शहर पोलीस ठाण्यातर्फे या दोघांच्या प्रामाणिकपणास मानाचा मुजरा करण्यात आला असून त्यांच्या या कृतीतून समाजातील प्रत्येक नागरिकाने प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *