| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड तालुक्यातील  खोरवडी व आलेगाव परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर मध्यरात्री सशस्त्र चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत नागरिकांना मारहाण करून तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. १० रोजी रात्री १ ते पहाटे ३.१० वाजण्याच्या दरम्यान खोरवडी व आलेगाव गावांच्या हद्दीतील विविध वाड्या-वस्त्यांवर पाच ते सात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकली. चोरट्यांनी चाकू, कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी काठ्या व दगडांचा धाक दाखवत नागरिकांना मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली.

यानंतर त्यांनी विविध घरांमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व दुचाकी असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. दरोडेखोरांनी अर्चना आवदे, शोभा खोमणे, नकाबाई शिंदे, मुकिंदा चलवादी, मिना कदम व इतर नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मल्हारी शिंदे यांनी फिर्याद दिली असून, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३११, ११८(१) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे.

चोरट्यांनी लंपास केलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, विवो कंपनीचे मोबाईल फोन तसेच दोन दुचाकींचा समावेश असून एकूण नुकसान ७ लाख १० हजार रुपयांचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *