| बारामती : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयातील १०५ विद्यार्थी व १० शिक्षकांनी मंगळवारी दि, ९ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे कार्य, कायद्याचे महत्त्व, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, बाल संरक्षण, व्यसनमुक्ती तसेच व्यक्तिमत्त्व विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस स्टेशनमधील तक्रार कक्ष, पासपोर्ट पडताळणी विभाग, मुद्देमाल कक्ष, लॉकअप रूम, सीसीटीएनएस प्रणाली, तपास पथक आणि नागरिक सेवा विभाग यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून देण्यात आली. तक्रार नोंदणी, गुन्ह्यांचा तपास, पुरावे जतन करण्याची प्रक्रिया तसेच विविध पोलीस सेवांची माहितीही देण्यात आली.
बालकांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच व्यसनांचे दुष्परिणाम, चांगल्या सवयींचे महत्त्व आणि योग्य मित्रपरिवाराची निवड याविषयी जागृती करण्यात आली.
वाहतूक सुरक्षेअंतर्गत रस्ता ओलांडण्याचे नियम, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सोशल मीडिया, फेक लिंक, ओटीपी फसवणूक आणि ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी पोलीस विभागाकडील विविध शस्त्रांची माहिती तसेच संविधानाने दिलेले अधिकार आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयीही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
हा उपक्रम पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.
