| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्यूज मराठी

हातवळण (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त ‘एक विद्यार्थी–एक झाड’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते ॲड. नरेंद्र फडके यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना दीड वर्षे विकसित केलेली केशर आंब्याची रोपे वाटप करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील तीन वर्षे आपल्या झाडाचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

या उपक्रमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने गुरुपौर्णिमा २०२९ पर्यंत आपल्या झाडाची नियमित काळजी घ्यायची आहे. झाड लावल्यानंतर दर महिन्याच्या १ तारखेला त्याचे छायाचित्र घेऊन वाढीची नोंद ठेवली जाणार आहे. गुरुपौर्णिमा २०२९ पूर्वी सर्व झाडांचे प्रत्यक्ष परीक्षण करण्यात येणार असून उत्कृष्ट वृक्षसंवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय ७ हजार आणि तृतीय ५ हजार अशी रोख बक्षिसे ॲड. नरेंद्र फडके यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.

वितरित करण्यात आलेली केशर आंब्याची रोपे विकसित अवस्थेतील असल्याने योग्य संगोपन केल्यास पुढील तीन वर्षांत त्यांना फलधारणा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः जपलेल्या वृक्षाच्या वाढीपासून फलधारणेपर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी पंचायत समिती दौंडचे गटविकास अधिकारी अरुण मळभर यांनी उपक्रमाचे कौतुक करताना, “वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत उत्तरदायित्व आणि सातत्य निर्माण करणारा हा उपक्रम अनुकरणीय असून इतर शाळांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो,” असे मत व्यक्त केले. त्यांनी ॲड. नरेंद्र फडके, मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे, गटविकास अधिकारी अरुण मळभर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश फडके, माजी सरपंच रमेश जगताप, माजी सरपंच अनिल गवळी, दशरथ सरडे, सामाजिक कार्यकर्ते संपत आबा फडके, शिक्षक भालेराव सर, घोरपडे सर, साळुंखे सर, सौ. साळुंखे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांनी गुरु-शिष्य परंपरा, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. वृक्षारोपणाला दीर्घकालीन वृक्षसंवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणारा आणि इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *