
| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्यूज मराठीसाठी
यवत ( ता. दौंड ) येथील निळकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर यवत ग्रामपंचायतीने बुधवार दि ३० रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली श्री काळभैरवनाथ मंदिर प्रांगणात भरलेल्या या बैठकीत अनधिकृत बांधकाम, प्लॉटिंग, रहिवासी आणि परवानग्या यासंबंधी प्रश्नांवर तीव्र आणि वादळी चर्चा झाली.
ग्रामसभेची सुरुवात मूर्ती विटंबनेच्या घटनेचा तीव्र निषेध करून करण्यात आली. यवतमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय किंवा बाहेरून अनधिकृतपणे स्थलांतरित होणाऱ्या रहिवाशांची कोणतीही अधिकृत नोंद नसताना त्यांना स्थानिक कागदपत्रे कशी दिली जातात, यावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. महा-ई-सेवा केंद्रातून मिळणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता नाही, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली.

धनगर वाडा परिसरात एका विशिष्ट समाजासाठी मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्री होत असल्याचे निदर्शनास आणत याला प्रशासनाची परवानगी कशी मिळाली, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. तलाठ्यांकडून पैसे घेऊन नोंदी केल्या जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी झाला.
पूर्वी गावात एकच मशीद असताना सध्या त्यांची संख्या वाढलेली आहे. मशिदींवरील ध्वनीवर्धक यंत्रणा (स्पीकर) राज्य शासनाच्या आदेशानुसार बंद असताना यवत येथे त्यांचा वापर कसा सुरू आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. मशिदींमध्ये उर्दू माध्यमातून शिक्षण दिले जात असून, मराठी ही राज्यभाषा असताना स्थानिक पातळीवर तिचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
गावात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याचे स्पष्ट दिसत असून, केवळ १२०० स्क्वेअर फुटांची नोंद असलेल्या जागांवर ३००० स्क्वेअर फुटांचे बांधकाम कसे झाले, याबाबत संतप्त प्रश्न विचारण्यात आले. अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी करत, अन्यथा ग्रामस्थ स्वतः कारवाई करतील, असा इशारा देण्यात आला.
शिवमूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपीला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी झाली. मस्जिद परिसरात रात्रीच्या वेळेस नक्की काय घडते, याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणीही झाली.
सरपंच समीर दोरगे यांनी पुढील आठ दिवसांत अनधिकृत रहिवासी व बांधकामांबाबत पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायत संयुक्तपणे सर्वेक्षण करून संबंधित यंत्रणांकडे अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. PMRDA कडे कारवाईसाठी अहवाल पाठवण्यात येईल.
पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथक आणि ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू असून, लवकरच अटक केली जाईल, अशी ग्वाही दिली. ग्रामस्थांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
PMRDA चे अधिकारी शशीभूषण होले यांनी संबंधित अनधिकृत बांधकामांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन कारवाई केली जाईल, असे सांगितले. तलाठी महेश मेटे यांनी प्लॉटिंगच्या नोंदींची तपासणी करून अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती दिली.
ग्रामसभेच्या शेवटी यवत गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. गावातील धान्य बाजार परिसरात स्मारक उभारण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा दुपारी अडीच वाजता शांततेत संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

