| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील हातवळण या गावाने अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते घडवले. त्यापैकी गेल्या अनेक वर्षांपासून शांत, संयमी आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडून काम करणारे नाव म्हणजे सागर नानासाहेब फडके. ग्रामविकास, सहकार आणि संघटन या तिन्ही क्षेत्रात सातत्याने कार्य करत आलेल्या सागर नानासाहेब फडके यांची गुरुवार दि, २ रोजी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) च्या संचालकपदी निवड झाल्याने हातवळणसह संपूर्ण दौंड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा संघर्ष, निष्ठा आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यावर उभा राहिलेला आहे. हातवळण गावचे स्वर्गीय ज्येष्ठ नेते नानासाहेब फडके यांच्या संस्कारातून समाजकारणाची प्रेरणा घेतलेल्या सागर फडके यांनी अल्पवयातच लोकसेवेचा मार्ग स्वीकारला.
सन २०१० मध्ये कमी वयात हातवळण गावच्या सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी गावाच्या विकासाला गती दिली. पाणी, रस्ते, मूलभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या विविध कामांमुळे त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. गावापुरते मर्यादित न राहता त्यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या कामाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली.
यानंतर माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मध्ये ते दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आले. पुढे त्यांना बाजार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी मिळाली. शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीशी संबंधित घटकांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केल्याची चर्चा त्या काळात होती.
राजकीय संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दौंड तालुका युवक अध्यक्षपदाची जबाबदारीही तब्बल तीन वर्षे सांभाळत असताना अनेक युवकांना पक्षाशी जोडणे, त्यांना सामाजिक आणि राजकीय कामात संधी उपलब्ध करून देणे, तसेच नव्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्याचे काम त्यांनी केले.
सहकार क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच उल्लेखनीय मानले जाते. हातवळण येथील श्री हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन ते सध्या जबाबदारी सांभाळत आहेत, सलग दहा वर्षे ते जबाबदारी सांभाळत आहे. त्यांनी शेतकरीहिताचे निर्णय, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य सभासदांशी जपलेले स्नेहसंबंध यामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.
राजकीय आयुष्यात त्यांनी नेहमी पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले. पक्षाच्या कठीण काळातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची भूमिका अनेकांना प्रेरणादायी वाटत आली आहे.
अलीकडील राजकीय घडामोडींनंतर अनेक कार्यकर्ते संभ्रमात असताना पक्षाच्या नेतृत्वाकडून विविध कार्यकर्त्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. अशच पार्श्वभूमीवर सागर फडके यांची कात्रज डेअरीच्या संचालकपदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीची दखल असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
कात्रज डेअरीसारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या संचालकपदी निवड होणे ही दौंड तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध व्यवसाय आणि सहकार क्षेत्रासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
सागर फडके यांच्या निवडीची बातमी समोर येताच हातवळण गावासह संपूर्ण दौंड तालुक्यातील कार्यकर्ते, मित्रपरिवार, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक माध्यमांवर अभिनंदनाच्या संदेशांचा ओघ सुरू असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
” सन २०१० पासून गावातून सुरू झालेला प्रवास आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नवी जबाबदारी घेऊन पुढे सरकत आहे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी खरी ताकद असून, शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न राहील, तसेच सन २०१० ते २०२६ या सोळा वर्षाच्या काळात अनेक गोर गरीब जनतेची सेवा ते करीत आहेत, तसेच पुढील काळात ही अशी सेवा सुरू राहील अशी भावना सागर नानासाहेब फडके यांच्यासह निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात आली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार पार्थ अजित पवार, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, महिला अध्यक्ष वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक पदाची जिम्मेदारी योग रितीने पार पडून काम केले जाईल. अशी माहिती (कात्रज डेअरी) च्या संचालकपदी निवड झालेले सागर फडके, यांनी दिली आहे..
