| सासवड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

सासवड पोलीस स्टेशनच्या पथकाने बोपगाव ( ता. पुरंदर ) येथील एका गोदामावर छापा टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २१ लाख ७० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, बोपगाव हद्दीतील कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका गोदामात मानवी आरोग्यास अपायकारक व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यात आला आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाड टाकली.

छाप्यामध्ये “सिग्नेचर फाइनेस्ट पान मसाला”, अँक्शन-७ सुगंधी तंबाखू”, “सम्राट पान मसाला” तसेच “एस.टी.-१ सुगंधी तंबाखू” असा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत २१ लाख ७० हजार ९६० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई प्रणय राजेंद्र मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिराज शेख (रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रतिबंधित गुटख्याविरोधातील ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांचा करडा वचक कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *