| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठी
दौंड येथील उपकारागृहात (सबजेल) दाखल करण्यासाठी नेण्यात येत असताना पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या आरोपीला यवत पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आंध्र प्रदेशातून ताब्यात घेत मोठे यश मिळविले आहे.
यवत पोलीस ठाण्यात दि. १ जून रोजी दाखल असलेल्या गुन्हा मधील आरोपी व्यंकटेश नान तरपतैया (वय ३०, रा. येल्लूर, विजयवाडा, आंध्र प्रदेश) याला अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीला सायंकाळी दौंड उपकारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार विकास कापरे व पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे हे खाजगी वाहनाने घेऊन जात होते.
दौंड येथे पोहोचल्यानंतर आरोपीला उपकारागृहात दाखल करण्यापूर्वी आवश्यक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत काढण्यासाठी वाहन दौंड पोलीस ठाण्यासमोर थांबविण्यात आले. त्यावेळी पोलीस हवालदार विकास कापरे हे झेरॉक्स काढण्यासाठी वाहनातून उतरले होते, तर पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे आरोपीसोबत वाहनात थांबले होते.
याच संधीचा फायदा घेत आरोपी व्यंकटेश तरपतैया याने अचानक वाहनाचा दरवाजा उघडून पळ काढला. पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे यांनी त्याचा पाठलाग करून अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले आणि घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच यवत व दौंड पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यात आला. दरम्यान, पोलीस हवालदार विकास कापरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात आरोपीने कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
त्यानंतर आरोपीच्या संभाव्य ठिकाणांची माहिती गोळा करून विशेष पथके आंध्र प्रदेशात रवाना करण्यात आली. अखेर दि. ३ जून २०२६ रोजी आरोपीच्या मूळ गावी येल्लूर (विजयवाडा, आंध्र प्रदेश) येथे शोधमोहीम राबवून आरोपी व्यंकटेश तरपतैया याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांच्या विशेष पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

