| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
भांडगाव ( ता. दौंड) येथे स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन युवकांना तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि बलेनो कारसह ताब्यात घेतले. या कारवाईत ५ लाख ३७ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध शस्त्रांविरोधातील मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई पोलिसांनी केली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा (कोल्हापूर परिक्षेत्र) यांच्या निर्देशानुसार व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत ७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत परिसरात गस्त घालत असताना भांडगाव येथे नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमध्ये तीन युवक गावठी पिस्तुलांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी सोनाक्षी मंगल कार्यालयासमोर सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनातील मंगेश शंकर मासोळे (२४ वर्षे), सूरज संजय शेलार (२६ वर्षे ) आणि रोहित प्रेमदास भजवणे (२४ वर्षे ), सर्व रा. यवत, ता. दौंड यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे व बलेनो कार असा एकूण ५ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे..
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ही शस्त्रे कोठून आणली, कोणाकडून खरेदी केली आणि कोणत्या हेतूने बाळगली होती, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन घाडगे, असिफ शेख तसेच पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजू जाधव, विकास पाटील, राजू मोमीन, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, संदीप देवकर, धीरज जाधव आणि मोहन भानवसे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.
