| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
पुणे – सोलापूर महामार्गावर बोरीपारधी गावाच्या हद्दीत गुरुवारी दि, २ रोजी सकाळी सुमारे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत यवत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी नरबाल राजपूत (वय १९ वर्षे ) रा. कोयाळी ता. खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भागवत बालाजी धर्मकर (रा. सावरगाव निपाणी, ता. कंधार, जि. नांदेड) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो गाडी नंबर – एम,एच – ४२ बी, एफ – ५८०८ हा निष्काळजी पणे व भरधाव वेगात चालवत पुणेहून सोलापूरकडे जात होता.
बोरीपारधी येथील धायगुडेवाडी परिसरातील जगदंब हॉटेलसमोर त्याने अचानक टेम्पो वळविल्याने मागून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक बसली.
या अपघातात सेहवाग नरबाल राजपूत ( वय २४ वर्षे ) यांचा मृत्यू झाला असून इशांत विनोद राजपूत व विकेश कमलेश राजपूत हे दोघे जखमी झाले आहेत. तसेच तीनही दुचाकी व टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६, २८१, १२५ ( ३), १२५ ( ब ), ३२४ ( ४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू असून पोलीस हवालदार वलेकर यांनी गुन्हा नोंदविला आहे, तर पुढील तपास पोलीस अधिकारी रजपूत करत आहेत.

