| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील पाटस येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( पी.एम. किसान ) योजनेअंतर्गत २३ व्या हप्त्याचे वितरण तसेच शेतकरी मार्गदर्शन मेळावा शनिवार, दि. २० रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पाटस येथील ‘संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स’ येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी कोलकाता येथून ऑनलाइन माध्यमातून देशभरातील ९.४४ कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८,८८० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे जमा केली. या ऐतिहासिक वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपस्थित शेतकऱ्यांनी अनुभवले.
या कार्यक्रमाला भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) – केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथील प्रधान शास्त्रज्ञ डॉ. अशोक कुमार भारीमल, मुख्य तांत्रिक अधिकारी भारत पवार आणि सहाय्यक मुख्य तांत्रिक अधिकारी प्राची म्हात्रे यांनी विशेष उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तर UPL चे क्रॉप मॅनेजर अमोल आंधळे यांनी “ऊस पिकातील तण, कीड व रोग नियंत्रण” या विषयावर सविस्तर माहिती दिली.
विजय सांगळे यांनी “एआय (AI) तंत्रज्ञान – बदलत्या काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीतील वाढता वापर आणि त्याचे फायदे स्पष्ट केले. तसेच AI आधारित माती परीक्षणाचे थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
तर शेतकरी डॉ. संदीप घोले यांनी भविष्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज अधोरेखित करत शाश्वत शेतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमाचे आयोजन ‘संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स’चे संचालक डॉ. संदीप घोले यांनी केले होते. परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पी.एम. किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि सेंद्रिय शेतीविषयीचे मार्गदर्शन यामुळे मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
