| बारामती : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने व इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून अवैध अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७८/२०२६ अन्वये एनडीपीएस अँक्ट कलम ८(c), २०(b)(ii)(c), २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळोची–पिंपळी रोड परिसरातील भारत कांबळे यांच्या शेताजवळ दोन प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ४७८.९५० किलो गांजा (किंमत सुमारे २ कोटी ३९ लाख ४७ हजार ५०० रुपये) साठवलेला आढळून आला होता.

या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलीस यांच्या दोन पथकांनी समांतर तपास सुरू केला. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. यामध्ये प्रकाश ऊर्फ पक्या मोहन काटे (रा. कल्याणीनगर, तांदुळवाडी, बारामती), समाधान धर्मराज गायकवाड (रा. सांगवी, बारामती), प्रिन्सकुमार मुन्ना सिंग (रा. महाराजगंज, बिहार), राहुल कल्याण गोरे (रा. बीड) यांना अटक करण्यात आली.

त्यांच्या चौकशीत विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे (रा. तांदुळवाडी, बारामती), संग्राम ऊर्फ चंदन सिंग (रा. कोलते पाटील इस्टेट, पुणे) आणि जॉकी माझी (रा. ओडिसा) यांचा सहभाग उघड झाला. हे आरोपी छत्तीसगड येथून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, संशयित आरोपी दोन इनोव्हा कारमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. सांगलीतील कारवाईत ( एमएच – 02 सीजेड – 0302 या इनोव्हा कारमधून १३४ किलो गांजा (किंमत ३३ लाख ५५ हजार रुपये) जप्त करण्यात आला आणि विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे यास ताब्यात घेण्यात आले. तसेच बारामती परिसरात ( एमएच -०२ इइ – 4949 ) या इनोव्हा कारवर कारवाई करून २३ किलो गांजा (किंमत ११ लाख ५५ हजार रुपये) जप्त करण्यात आला व हुसेन सुखदेव लष्करे, आदित्य विकास शिंदे व युवराज ज्ञानेश्वर दुर्गे यांना अटक करण्यात आली.

एकूण ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने व इतर मुद्देमाल असा सुमारे ३ कोटी ३ लाख,९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही मोठी आंतरराज्यीय तस्करीची टोळी उध्वस्त करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, स.पो.नि कुलदीप संकपाळ, ग्रेड पो.स.ई बाळासाहेब कारंडे तसेच पोलिस अंमलदार अभिजीत एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, अमोल शिंदे, उत्तम खाडे, यशवंत पवार, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, अक्षय सिताप, विशाले शिंदे, सागर जामदार, बनसोडे व झणझणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *