| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी         

कर्नाटक राज्यातील चिंकमंगळूर येथून पुण्यातील गुलटेकडी येथे विक्रीसाठी पाठविण्यात आलेल्या तब्बल ६ लाख ६८ हजार ७७५ रुपये किमतीच्या ३६१५ किलो खोबऱ्याच्या अपहार प्रकरणाचा दौंड पोलिसांनी छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. अपघाताचा बनाव रचून चोरी लपविण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत दौंड पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत मारुल सिद्धाप्पा (रा. चिंकमंगळूर, कर्नाटक) यांनी त्यांची आयशर टेम्पो क्रमांक MH 47 AS 5368 मध्ये खोबरे भरून पुणे येथे विक्रीसाठी पाठविले होते. सदर वाहन चालक मनोज आंध्रेश बनसोडे (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्या ताब्यात देण्यात आले होते.

दरम्यान, १९ मे २०२६ रोजी सकाळी चालक मनोज बनसोडे याने फिर्यादी यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली की, कुरकुंभ (ता. दौंड) परिसरात सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल अनन्या समोर वाहनाचा अपघात होऊन टेम्पो पलटी झाला असून त्यातील खोबरे अज्ञात इसमांनी चोरून नेले आहेत.

मात्र, घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी आणि प्राथमिक चौकशीदरम्यान पोलिसांना संशय आल्याने अधिक सखोल तपास करण्यात आला.

यावेळी चालक मनोज बनसोडे याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार सुनील दत्तात्रेय लावरे, अनिकेत रावसाहेब पवार व तुषार लक्ष्मण जगताप (सर्व रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्या मदतीने टेम्पोमधील खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केल्याची कबुली दिली.

तसेच चोरीचा प्रकार लपविण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचेही तपासात उघड झाले. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली असून गुन्ह्यातील ६ लाख ६८ हजार ७७५ रुपये किमतीचे ३६१५ किलो खोबरे जप्त करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक बिद्री, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, धनाजी गाढवे, अंतुल पठाण, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, संजय कोठावळे, गोरख हजारे, सोमनाथ चौंडे, पवन माने व महादेव जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *