| पुणे : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

पुणे, धनकवडी येथे ‘कारगिल विजय दिनाच्या’ पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाला मानवंदना देण्यासाठी सरहद पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि सरहद लॉ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्री शौर्यथॉन रन’चे  शनिवार दि. ४ रोजी उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. ‘रिमेंबरन्स टू रिस्पॉन्सिबिलीटी, या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

रविवार ५ जुलै रोजी लडाखमधील द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियल येथे होणाऱ्या ‘रण फॉर ब्रव्हर्ट्स – शरद शौर्यथॉन २०२६  ‘कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ या आठव्या शौर्यथॉनला पाठिंबा व जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यात या प्री शौर्यथॉनचे आयोजन करण्यात आले होते. कारगिलच्या अमर वीरांच्या स्मृती जागवत राष्ट्रप्रेम, कर्तव्यभावना आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाला सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, सरहद लॉ स्कूलच्या प्राचार्या सत्यवती खळदकर, सरहद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सुजाता गोळे, मॅरेथॉनचे उद्घाटक महेश वाबळे, अर्जुन राजीवाडे, सुभाष जगताप, तळजाई माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरज थोरात, स्मरण थोरात, मयूर मसुरकर तसेच सरहद लॉ स्कूलच्या सहाय्यक प्राध्यापिका संपदा कुलकर्णी, स्वाती डिंबर, ग्रंथपाल मनीषा जगताप, शिक्षकेतर कर्मचारी आकाश गपाट, सुनीता शिंदे, सुवर्णा राजगुरू यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्यगाथांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची प्रेरणा दिली. या उपक्रमासाठी सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यानंतर ‘सरहद शौर्यथॉन’चा ध्वज फडकवून धाव स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सरहद पब्लिक स्कूल ते तळजाई माता मंदिर या मार्गावर झालेल्या धाव स्पर्धेत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला.

स्पर्धेनंतर विविध गटांतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सरहद लॉ स्कूलचा विद्यार्थी यश मुलूक याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमाचे समन्वयन सहाय्यक प्राध्यापिका उत्कर्षा धुमाळ आणि कौशल बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरहद संस्था, सरहद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सरहद लॉ स्कूल, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, स्वयंसेवक आणि सर्व सहभागी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रिमेंबरन्स टू रिस्पॉन्सिबिलीटी’ हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवत या प्री शौर्यथॉनमुळे द्रास येथे होणाऱ्या शरद शौर्यथॉन २०२६  ‘कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ विषयी जनजागृती निर्माण झाली असून कारगिलच्या अमर वीरांना सामूहिक मानवंदना अर्पण करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *