| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील वाखरी येथील अंबिका कला केंद्र येथे सोमवार दि, २१ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणात एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना दौंड येथील प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, चौथा आरोपी देखील आता पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना सोमवार दि २१ जुलै रोजी रात्री चौफुला परिसरातील वाखरी येथील अंबिका कला केंद्रात एका खासगी कार्यक्रमादरम्यान घडली. संगीत आणि नृत्य सादरीकरणाच्या वेळेस वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कैलास हिरामण उर्फ बाळासाहेब मांडेकर याने गोळी झाडली.
सुरुवातीला कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी हा प्रकार गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिक पत्रकारांच्या लक्षवेधी पाठपुराव्यामुळे घटनेचा तपशील उघडकीस आला. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कैलास मांडेकर, गणपत जगताप आणि रघुनाथ आव्हाड या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून आज दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांनी तब्बल अर्धा तास अधिक युक्तिवाद केला. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोमवार दि, २८ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या गुन्ह्यातील चौथा आरोपी चंद्रकांत मारणे देखील पोलिसांच्या ताब्यात आला असून, त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
घटनेमुळे चौफुला परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

