| दौंड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

यवत येथील सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २०) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अशोक विश्वनाथ थोरबोले (वय ५७, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) आणि गणेश धनंजय दोरगे (वय २८, रा. यवत, ता. दौंड) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थोरबोले कुटुंबीयांसह आपल्या मूळ गावी गोजवडा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथे वडिलांच्या मासिक कार्यक्रमासाठी गेले होते. पुण्याकडे परतताना त्यांची कार (एमएच १२ टीवाय ७५३१) यवत गावच्या शेरु हॉटेलजवळ पोहोचताच समोरून आलेल्या स्विफ्ट कारशी धडकली.

दरम्यान, पुण्याकडून यवतकडे येणारी दुसरी कार (एमएच १२ युडब्ल्यू ५०५२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून समोर आली आणि ती थोरबोले यांच्या गाडीवर आदळली. त्याचवेळी मागून येणारी आणखी एक कार (एमएच १२ एनयू ५५०१) सुद्धा धडकली.

या भीषण अपघातात थोरबोले व दोरगे यांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मयत थोरबोले यांचे भाऊ ज्ञानेश्वर थोरबोले यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी स्विफ्ट कार चालक राकेश मारुती भोसले (रा. बोरीभडक, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद भोसले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *