| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी ३० किलो गांजा जप्त केला असून, या कारवाईत एकूण 20 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलिस कोठडीत असल्याची माहिती यवत पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. ३१ मार्च रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे–सोलापूर महामार्गावर धायगुडेवाडी (ता. दौंड) हद्दीत हॉटेल दुर्गा समोर नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपी अंमली पदार्थांची वाहतूक करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला.

या कारवाईत आरोपी शाकीर शब्बीर पानसरे (रा. सध्या सुपे, ता. बारामती) आणि समाधान शिवाजी दाभाडे (रा. येवलेवाडी, ता. हवेली) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २९ किलो ६०० ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे १४ लाख ५० हजार रुपये) तसेच ५ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 291/2026 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(ब), 20(इ) तसेच बीएनएस 2023 च्या कलम 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *