| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
कानगाव (ता. दौंड) येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेले कानगाव येथील धरणे आंदोलन माजी आमदार रमेश थोरात यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने कांद्याला हमीभाव, कर्जमुक्ती, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, ऊसाला ५ हजार रुपये टन दर, कापूस व सोयाबीनला हमीभाव, दुधाला बाजारभाव, तसेच क्षारपड जमिनीवरील समस्या यांसह आठ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते.

माजी आमदार थोरात यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निवेदन पोहोचवले. यावेळी आठ मागण्यांपैकी सहा मागण्या केंद्र सरकारच्या अधिकारात व दोन मागण्या राज्य सरकारच्या अधिकारात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांना आश्वासन देत, केंद्र सरकारकडे शिफारस करण्याबरोबरच लवकरच होणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेत शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याची ग्वाही दिली.
या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
या वेळी भानुदास शिंदे, भाऊसाहेब फडके, सयाजी मोरे, दादासो गवळी, किसन चौधरी, राजेंद्र मोरे, दत्तात्रय फडके, आप्पासाहेब कोर्हाळे, नानासो कोर्हाळे, नामदेव निगडे, गणपत नलवडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती शेतकरी आक्रोश कृती समितीचे प्रमुख भानुदास शिंदे यांनी दिली.

