| शिरूर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
भीमा – कोरेगाव येथील ऐतिहासिक व क्रांतिकारी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संपूर्ण परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बहुस्तरीय बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत नजर ठेवली जाणार आहे.

कोरेगाव भीमा परिसरात येणाऱ्या लाखो भीम अनुयायांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही तसेच वॉच टॉवरच्या माध्यमातून हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. संशयास्पद व्यक्ती, वस्तू अथवा हालचाली आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून ड्रोनद्वारे गर्दी व वाहतुकीवर नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कंट्रोल रूममधून थेट निरीक्षण तसेच बीडीडीएस व क्यूआरटी पथक देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी त्वरित प्रतिसाद यंत्रणा तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, वाहतूक मार्गात बदल आणि माहिती देणारे फलक उभारण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
भीमा-कोरेगावचा हा अभिवादन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज असून कोणतीही अफवा पसरविणाऱ्याची किंवा गैरप्रकार करणाऱ्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, भीमा-कोरेगाव येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भीम अनुयायांसाठी आरोग्य सुविधा तसेच फिरत्या शौचालयाची सुविधा करण्यात आली आहे. १ जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीस होणाऱ्या या ऐतिहासिक क्रांतिकारी व अभूतपूर्व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना व्यवस्थितरित्या योजलेल्या आहेत की नाहीत याचा पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी शुक्रवारी स्वतः उपस्थित राहत आढावा घेतला व कडक बंदोबस्त ठेवण्यासंदर्भात पोलीस प्रशासनास मार्गदर्शन केले.

