| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड शहरातील सरपंचवस्ती परिसरात पोलिसांनी कारवाई करत ५० हजार ६०२ रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि २८ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सरपंचवस्ती, दौंड येथील ओमसिद्धी सूरज अपार्टमेंट, डी विंग, फ्लॅट क्रमांक १४ येथे प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांना मिळाली.
त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे दौंड पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत विमल पानमसाला आणि तंबाखू जन्य विविध पॅकेट व पुड्यांचा साठा आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५० हजार ६०२ रुपये आहे. जप्त केलेल्या मुद्देमालावर पंचांसमक्ष कागदी सील व लेबले लावून तो ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी शोएब लाडलेमशाक मुल्ला (वय २४, व्यवसाय-शिक्षण, रा. ओमसिद्धी सूरज अपार्टमेंट, समतानगर, सरपंचवस्ती, गोपाळवाडी रोड, दौंड) याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला शनिवार दि, २८ रोजी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व नियमन २०११ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री करीत आहेत.

