| दौंड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मत ‘खेती बचाओ अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यक्त करण्यात आले.

सोमवार दि ८ ते  शुक्रवार दि १२  या  दिवसाच्या कालावधीत ICAR-CIRCOT, मुंबई, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स, डिजिटल खेती आणि चिपकू ट्रॅप यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड, शिरूर व हवेली तालुक्यात हे अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत शेतकरी संवाद, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने तसेच विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. माती परीक्षणाचे महत्त्व, रासायनिक खतांचा संतुलित वापर, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतांची निर्मिती, जीवामृताचा वापर तसेच रोग व किड व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमासाठी ICAR चे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरपुथराज, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सेंथिलकुमार, सहाय्यक मुख्य तांत्रिक अधिकारी  राजेश नारकर तसेच बिझनेस एक्झिक्युटिव्ह अमोल निंबाळकर यांचा समावेश होता.

याशिवाय दौंड व शिरूर तालुक्यातील महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्सचे संचालक डॉ. संदीप घोले, मनोज बारवकर, बापू ठोंबरे, गणेश लोले, मच्छिंद्र गवारी, डिजिटल खेतीचे संचालक विजय सांगळे तसेच चिपकू ट्रॅपचे संचालक गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

अभियानादरम्यान जवळपास ३० गावांमध्ये प्रत्यक्ष शेतकरी सभा घेऊन विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती व शाश्वत कृषी पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करण्यात या अभियानाला मोठे यश मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *