|दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दौंड शहर मंडलाध्यक्ष स्वप्नील पोपटलाल शहा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे यांच्याकडे त्यांनी रविवार दि २८ सप्टेंबर रोजी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दौंड शहरासह तालुक्यातील भाजपला मोठा धक्का बसला असून स्थानिक राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

शहा कुटुंब हे दौंड शहरात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या तीन पिढ्या पक्षाशी जोडलेल्या आहेत. स्वप्नील शहा यांनी २१ सप्टेंबर २०२३ ते ११ सप्टेंबर २०२५ या काळात तब्बल १ वर्षे १० महिने दौंड शहर मंडलाध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी पुणे जिल्हा व्यापारी आघाडीत उपाध्यक्ष व अध्यक्ष या जबाबदाऱ्याही सांभाळल्या होत्या.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात शहा आघाडीवर होते. उमेदवार विजयी होण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे शहरातील राजकीय वर्तुळात मानले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे ते नाराज होते. त्यामुळे शहा भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू होती.

राजीनामा पत्रात शहा यांनी स्पष्ट केले आहे की, मी प्रामाणिकपणे व एकनिष्ठतेने पक्षाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता माझ्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही, वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव मी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असून,पक्षाच्या कोणत्याही कामासाठी वेळ देता येणार नसल्याने  पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मला मुक्त करण्यात यावे असे म्हटले आहे.

दरम्यान, स्वप्नील शहा यांनी भाजप सोडल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *