| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

बनावट वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक आणि ओळखपत्रांचा गैरवापर करून विमा कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून दौंड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विशाल गोविंद मिसाळ, माधुरी विशाल मिसाळ आणि विमाधारक संकेत राजू होले यांचा समावेश आहे.

याप्रकरणी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक अभिजित शर्शिकांत मोरे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 318(4), 316(2), 336(3), 319(2), 340(2) व 61 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत राजू होले यांनी जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दौंड येथे १३ जुलै २०२४ ते १९ जुलै २०२४ या कालावधीत उपचार घेतल्याचे दाखवून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमा दावा दाखल केला होता. या दाव्याची पडताळणी करताना विमा कंपनीला काही कागदपत्रांबाबत संशय आल्याने सखोल तपास करण्यात आला.

तपासादरम्यान दाव्यासोबत सादर करण्यात आलेल्या पॅथॉलॉजी अहवालावर डॉ. माधुरी बहिरवाडे यांच्या नावाचा शिक्का व स्वाक्षरी असल्याचे आढळून आले. मात्र, त्यावर नमूद करण्यात आलेल्या वैद्यकीय नोंदणी क्रमांकाची अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी केली असता तो क्रमांक संबंधित डॉक्टरांच्या नावावर नसल्याचे कंपनीच्या तपासात समोर  आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

तसेच अहवालावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तो अमोल झिपारे नावाच्या अन्य व्यक्तीच्या वैद्यकीय नोंदणी क्रमांकाशी संबंधित असल्याचे आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याशिवाय, दावा अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या डॉ. माधुरी बहिरवाडे यांच्या नावाच्या आधारकार्डाचीही पडताळणी करण्यात आली. त्यातील नाव व जन्मतारखेची माहिती आणि अधिकृत नोंदणीतील डॉ. माधुरी विशाल मिसाळ यांच्या माहितीमध्ये तफावत असल्याचे कंपनीच्या तपासात निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या सर्व बाबींवरून बनावट वैद्यकीय कागदपत्रे, दुसऱ्या डॉक्टरांच्या नोंदणी क्रमांकाचा कथित गैरवापर तसेच ओळखपत्रांच्या आधारे विमा कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणातील विमा दावा कंपनीकडून रद्द करण्यात आला असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *