| दौंड : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी


दौंड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने बोरावकेनगर ( गोपाळवाडी ) येथील एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरावकेनगर येथील रिलॅक्स इन लॉजिंगमध्ये अनैतिक मानवी व्यापार व वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली. संबंधित महिलांकडून पैशांच्या मोबदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.

या कारवाईदरम्यान लॉजमध्ये सहा महिला आढळून आल्या. पोलिसांनी ५० रुपये किमतीची ‘जरूर’ कंपनीची तीन कंडोम पाकिटे तसेच बनावट ग्राहकास दिलेल्या ५०० रुपयांच्या दोन नोटा असा मुद्देमाल जप्त केला.

तपासात मनोज अनिल पवार (वय ३५, रा. फलटण, जि. सातारा) हा लॉज चालक वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान आढळलेल्या सहा महिलांची सुटका करून त्यांना आवश्यक मदत व समुपदेशनासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार तसेच दौंड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *