| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील पडवी गावच्या हद्दीत असलेल्या सुपे घाटातील धोकादायक वळणावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. पाटस येथून कुसेगाव, पडवी, देऊळगाडा परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान शाळेकडे निघालेली एसटी बस (एमएच-२० बीएल-३१२१) घाटातील पहिल्याच धोकादायक वळणावर पलटी झाली. बसमध्ये सुमारे ७० हून अधिक विद्यार्थी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसचा चालक नवीन असून तो बुधवारी पहिल्यांदाच या मार्गावर बस चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घाटातील धोकादायक वळणांची माहिती, मार्गाचा अनुभव आणि अशा अवघड मार्गावर चालकांना देण्यात येणारे मार्गदर्शन याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय होते, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. यवत पोलिस चौकीचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे योगेंद्र पवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
दररोज शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अचानक पलटी झाल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बसमधील विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या, पालकांची धावपळ आणि घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांचे मदतकार्य यामुळे काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते.
दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली. मात्र, अनेक विद्यार्थी जखमी झाल्याने या घटनेने विद्यार्थी आणि पालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या सुरक्षिततेबरोबरच या मार्गावरील धोकादायक वळणांचा प्रश्नही पुन्हा एकदा गंभीरपणे उपस्थित झाला आहे.
सुपे घाटातील तीव्र चढण आणि धोकादायक वळणांमुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. यापूर्वीही या घाटात अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. या घाटात आठवड्यातून दोन-तीन अपघात होत असल्याची माहिती यापूर्वी नागरिकांकडून देण्यात आली होती. धोकादायक वळणे कमी करावीत, संरक्षक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, वर्षे उलटूनही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला का, हा प्रश्न या अपघातानंतर पुन्हा उपस्थित झाला आहे.
घाटातील पहिल्याच वळणावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अशा ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे, आवश्यक ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढविणे, वेग नियंत्रणाच्या उपाययोजना तसेच धोकादायक वळणाची अभियांत्रिकी पद्धतीने तपासणी करण्याची गरज आहे.
पडवी ते सुपे याच मार्गावर विद्यार्थी दररोज शाळेत ये-जा करतात. त्यामुळे हा केवळ रस्त्याचा प्रश्न नसून शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे.
आज बस पलटी झाली आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र, उद्या पुन्हा अशीच दुर्घटना घडण्याची वाट पाहायची का, असा सवाल पालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.
प्रशासनाने या अपघाताची सखोल चौकशी करून बस पलटी होण्याचे नेमके कारण स्पष्ट करावे, जखमी विद्यार्थ्यांना तातडीने योग्य उपचार मिळतील याची खात्री करावी. तसेच एसटी प्रशासनाने चालकाच्या मार्गावरील अनुभवासह बसच्या तांत्रिक स्थितीची तपासणी करावी आणि सुपे घाटातील धोकादायक वळणाची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

