| पुणे : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, कामगार संघटक आणि कष्टकरी चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे बाबा आढाव यांचे आज रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृतीच्या समस्यांशी लढा देत होते. अखेर सोमवार दि, ८ रोजी रात्री ८.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने राज्यातीलच नव्हे देशभरातील सामाजिक चळवळींच्या इतिहासात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बाबा आढाव यांनी आयुष्यभर मजूर, कष्टकरी, असंघटित कामगार, भटक्या-विमुक्त समाज आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्कांसाठी न थकता संघर्ष केला. ‘एक गाव – एक पाणवठा’, ‘हक्काची वसुली’, ‘कष्टकरी संघटना’ अशा चळवळींनी त्यांच्या नेतृत्वाखाली नवे सामाजिक भान निर्माण केले आणि हक्कांसाठीच्या संघर्षाला व्यापक दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नांतून असंख्य कामगार आणि वंचित घटकांच्या जीवनात बदल घडून आला.
साधी जीवनशैली, ठाम भूमिका आणि निर्भीड स्वभाव यांची सांगड घालत त्यांनी समाजातील सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचे काम केले. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेले प्राधान्य आणि त्यासाठी उभा केलेला लढा आजही आदर्श मानला जातो.
त्यांच्या निधनाने सामाजिक परिवर्तन चळवळ, कामगार संघटना आणि असंघटित कामगारांचा एक दृढ आधार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल गहिवरून शोक व्यक्त केला आहे.
