| पुणे : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
कष्टकरी, असंघटित कामगार आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ समाजनेते डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे सोमवारी दि ८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. “सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर” हा सार्वत्रिक संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी झटणाऱ्या या थोर नेत्याच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मंगळवार दि ९ रोजीच्या सायंकाळी पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरचा निरोप देण्यासाठी हमाल भवनावर जनसागर उसळला होता.
डॉ. बाबा आढाव यांना आदरांजली वाहण्यासाठी १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, कामगार आणि विविध विद्यमान चळवळींतील कार्यकर्त्यांचा या सभेला मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे.
मार्केट यार्ड परिसरातील दुकाने बंद ठेवून व्यापारी व कामगार बांधवांनी आदरांजली वाहिली. सकाळी साडेआठ वाजता बाबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी हमाल भवन येथे आणण्यात आले, त्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी सतत वाढत होती. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, अधिकारी, व्यापारी, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवार दि ९ रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिस ताफा मानवंदना देण्यासाठी हमाल भवनात दाखल झाला. सलामी दिल्यानंतर डॉ. बाबा आढाव यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. परिसरात “अमर रहे बाबा तेरा नाम”, “सत्य की जय हो” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
