| इंदापूर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींवर इंदापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत “बुलेट राजां”ना चांगलाच दणका दिला आहे. शहर व ग्रामीण भागात धडाकेबाज आवाज करत धूम फिरणाऱ्या बुलेट वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईची मोहिम राबवली. या मोहिमेत तब्बल ३५ बुलेट गाड्यांवर कारवाई करून त्यांच्या बदललेल्या व कर्कश्य आवाज निर्माण करणाऱ्या सायलेन्सरवर थेट बुलडोझर फिरवण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहर व परिसरात बुलेट गाड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर लावून वाहनधारक रस्त्यावर धिंगाणा घालत होते. या कर्कश्य आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता तसेच अपघाताचीही शक्यता वाढत होती. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी व पथकाने मंगळवार दि. १२ रोजी विशेष मोहिम हाती घेतली.
या कारवाई दरम्यान पकडलेल्या ३५ बुलेट गाड्यांचे बदललेले सायलेन्सर काढून टाकण्यात आले आणि पोलिसांनी ते सायलेन्सर बुलडोझरच्या सहाय्याने चिरडून नष्ट केले. इतकंच नव्हे, तर संबंधित वाहनधारकांकडून तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी सांगितले की, “वाहनांवर अनधिकृत बदल करून कर्कश्य आवाज करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई सुरू राहणार आहे. इंदापूर शहरात शांतता व शिस्त राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरूच राहतील.”
या मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, तरुणांनी अशा प्रकारे वाहनांमध्ये बदल करण्याऐवजी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
