| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार दि २१ रोजी सकाळी साडे सहा च्या वेळेत दौंड पोलीस स्टेशन मध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी दौंड येथील फिटनेस एक्स्पर्ट व डायबिटीज रिव्हर्सल कोच डॉ. राजेश दाते तसेच योग तज्ज्ञ विजय जगदाळे यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनशैलीचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते, तणाव कमी होतो आणि दैनंदिन जीवन अधिक सकारात्मक बनते, असे मार्गदर्शन करण्यात आले. यानिमित्त उपस्थितांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचा संकल्प करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
या कार्यक्रमास दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
