| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

यवत पोलिसांच्या तत्परता, नियोजनबद्ध शोधमोहीम आणि रात्रभर केलेल्या अथक प्रयत्नांमुळे २१ महिन्यांच्या बालकाचा अवघ्या काही तासांत शोध घेण्यात यश आले. आयुष उर्फ भैय्या सोमनाथ बंडगर (वय २१ महिने) हा बालक सुखरूप आढळून आल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सोमवार दि. १५ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या दरम्यान खुटबाव ( थोरातवस्ती ) येथील सोमनाथ माणिक बंडगर यांच्या घराच्या पाठीमागील नाथ म्हस्कोबा मंदिरासमोर त्यांचा मुलगा आयुष खेळत होता. यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला आमिष दाखवून अथवा फूस लावून घेऊन गेल्याची तक्रार आयुषचे वडील सोमनाथ बंडगर यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये दिली.

तक्रारीच्या आधारे यवत पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तातडीने शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांची विशेष पथके तयार करण्यात आली. तसेच वनविभागाच्या मदतीने परिसरातील ऊस शेती, रस्ते, निर्जन ठिकाणे आणि आसपासच्या भागात कसून शोध घेण्यात आला.

शोधमोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यवत पोलिसांनी रात्रभर सतर्कतेने शोधकार्य सुरू ठेवले. अखेर मंगळवार दि.१६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता घराजवळील ऊसाच्या शेतात आयुष सुखरूप अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

यवत पोलिसांनी अल्पावधीत प्रभावी शोधमोहीम राबवत बालकाचा शोध लावल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या शोध मोहीमेत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, विजय कोल्हे, सागर माने, बाळकृष्ण गाडेकर तसेच पोलीस अंमलदार संतोष कदम, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, वैभव भापकर, संदीप करे, मोहम्मद अली मड्डी, मारुती बाराते, अमोल भुजबळ, प्रणव ननवरे आणि दिनेश पोळ यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *