| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील बोरीपारधी गावात तरुणांनी एकत्र येत सर्व महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर येथील युवराज छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना महामानवांच्या विचारांची आज अधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले.
संभाजी राजे म्हणाले की, “आज महाराष्ट्रात जातीय तणाव, धर्माच्या नावावर भेदभाव आणि वाद मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे समाजातील सुख-शांती हरवत चालली आहे. अशा कठीण काळात महामानवांचे विचारच समाजाला दिशा देऊ शकतात. त्यामुळे सर्व महामानवांच्या विचारांचा जागर करणारे संयुक्त जयंती महोत्सव राज्यभर व्हायला हवेत.”
या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्या गायत्री खळदकर, सदस्य गणेश थोरात, सागर शेलार, साहेबराव पोळ, जिल्हा दूध संघाचे संचालक राहुल दिवेकर, सागर फडके, नितीन दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संभाजी राजे पुढे म्हणाले की, “महापुरुषांच्या बलिदानातून आणि विचारातून समाजाला माणुसकी मिळाली होती. मात्र आज ती हरवत चालली आहे. त्यामुळे अशा सामुदायिक जयंती सोहळ्यांतून प्रबोधनपर कार्यक्रम होणे ही काळाची गरज आहे.” ग्रामीण भागातील नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, याची सुरुवातीला शंका होती; मात्र गावातील तरुणांनी एकत्र येऊन निर्माण केलेला हा सोहळा प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन दौंड तालुक्यातील प्रत्येक गावात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बोरीपारधी गावात आगमन झाल्यानंतर हलगी, सनई-चौघड्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संभाजी राजे यांचे स्वागत करण्यात आले. गावातील सर्व जाती-धर्मातील तरुण यावेळी एकत्र सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळेपासून चावडीपर्यंत संभाजी राजे पायी चालत आले.
कार्यक्रमासाठी श्रीगोंदा येथून फुले-शाहू-आंबेडकर विचारवंत ॲड. संभाजी बोरुडे, ॲड. महेंद्र शिंदे, मुकुंद सोनटक्के, सत्यशोधक विधीकर भीमराव कोथिंबीर तसेच भिगवण येथील ॲड. जगताप, पत्रकार भरत मल्लाव व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान “मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय” या एकपात्री नाटकाचा प्रयोग नटसम्राट कुमार आहेर यांनी सादर केला. तसेच त्यांनी संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित एकपात्री प्रयोगही सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या प्रयोगाचे संभाजी राजे यांनी विशेष कौतुक केले.
समाज कल्याण विभाग पुणे येथील सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनीही कार्यक्रमात मार्गदर्शन केले. त्यांनी तरुणांना प्रेरणा देतानाच पालकांनी मुलांना घडवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.
जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून रेल्वे युनियनचे एनआरएमयू पदाधिकारी अनिल धेंडे, स्वर साधना संस्थेचे दादासाहेब सोडनवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी संत गाडगेबाबांच्या “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाला साथ दिली.
कार्यक्रमस्थळी सर्व महामानव व महामातांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपतींच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संभाजी राजे यांनी अभिवादन केले. बोरीपारधी गावात प्रथमच अशा स्वरूपाचा भव्य संयुक्त जयंती महोत्सव झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अशा कार्यक्रमांची परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
