| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा दौंड नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा श्रीमती उषादेवी कृष्णराव जगदाळे-पाटील (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे दौंड तालुक्यावर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

उषादेवी जगदाळे यांनी १९७२ ते १९७७ आणि १९८५ ते १९९० या कालावधीत दौंड विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी १९७१ ते १९७२ या कालावधीत त्यांनी दौंड नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांचे पती दिवंगत कृष्णराव बाजीराव जगदाळे-पाटील यांनीही १९८० ते १९८५ दरम्यान मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.

खानवटे (ता. दौंड) येथील राजेभोसले घराण्यात जन्मलेल्या उषादेवी या विवाहानंतर दौंडच्या सूनबाई झाल्या आणि पुढे जनतेच्या मनातील माँसाहेब बनल्या. आपल्या शांत, संयमी आणि मृदू स्वभावामुळे त्या सर्व स्तरांतील नागरिकांमध्ये आदराचे स्थान राखून होत्या. विरोधकांविषयीही आकसभाव न बाळगता आदराने संवाद साधणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या कार्यकाळात दौंड तालुक्यातील अनेक पायाभूत विकासकामांना गती मिळाली. सिंचन व्यवस्था, कुरकुंभ येथील एमआयडीसी, रस्ते विकास, रेल्वे स्थानकांची उभारणी तसेच खोर येथे सरस्वती शिक्षण संस्थेची स्थापना यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या पुढाकारातून मार्गी लागले. १२ एप्रिल १९७६ रोजी दौंड–पुणे–दौंड रेल्वे शटलला हिरवा झेंडा दाखविण्याचा मानही त्यांच्या हस्ते मिळाला होता.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित कन्या, सूना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष तथा दौंड शुगर लिमिटेडचे संस्थापक संचालक वीरधवल जगदाळे हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र असून विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे हे धाकटे पुत्र आहेत. दौंड नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे या त्यांच्या नात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *