| बारामती : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

गोवंश कत्तल व अवैध वाहतूक प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी रविवार दि १९ रोजीच्या मध्यरात्री गोकुळनगर, मळद–फलटण रोड येथे धाडसी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत १० गायी व ७ बैल असे एकूण १७ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत हलविण्यात आले असल्याची माहिती बारामती शहर पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली आहे.

या बाबत दिलेली माहिती अशी की, पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचताच कत्तल करणारे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. त्यामुळे त्यांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 150/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम, २०१५ तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६० अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गोवंश कत्तल व प्राण्यांवरील क्रूरतेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाणार असल्याचा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, सहाय्यक पो.उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार संजय जाधव, यशवंत पवार तसेच पोलीस शिपाई अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, ऋषिकेश जाधव व सुरज घाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. संबंधित आरोपींविरुद्ध पूर्वीचे गुन्हे आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

जप्त केलेली सर्व जनावरे दयोदय गोशाळा, मळद येथे सुरक्षित ठेवण्यात आली असून त्यांची योग्य देखभाल केली जात आहे.
नागरिकांनी गोवंश हत्या, अवैध वाहतूक किंवा प्राण्यांवरील क्रूरतेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *