| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

दौंड तालुक्यातील मांढरे मळा परिसरात दौंड – पाटस रोडवर असलेल्या हॉटेल जगदंबा येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही दुर्घटना बुधवार दि ७ जानेवारी रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. हॉटेलमधील स्वयंपाकघरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच आगीचे लोळ उसळले. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तपासादरम्यान हॉटेलमध्ये १० कमर्शियल गॅस सिलेंडर तसेच परवानगीशिवाय वापरण्यात येणारे १२ घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले. व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी हॉटेलचे मालक किरण सौताडे आणि मॅनेजर विश्वनाथ जानभरे (दोघेही रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या स्फोटात धर्मा महेश निषाद, रामप्रकाश वर्मा, बिपिन वर्मा, करण वर्मा, रामप्रकाश धर्मा, कन्हैया वर्मा, दीपक कुमार, मनी कुमार, हटेसिंग उर्फ छोटू कुमार आणि मोहन वर्मा हे दहा कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सहा जणांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना उत्तरप्रदेशमधील आग्रा येथे हलविण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान कन्हैया वर्मा, रामप्रकाश वर्मा, मनीराम वर्मा, कुकरन निषाद आणि दीपक वर्मा या पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून व्यावसायिक ठिकाणी गॅस सिलेंडरच्या वापराबाबत कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *