| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

रोटी ( ता. दौंड ) येथील ग्रामदैवत रोटमलनाथ मंदिरात सुरू असलेल्या जावळ विधीच्या पारंपरिक रुढी-परंपरांबाबत निर्माण झालेल्या वादावरून आता प्रशासकीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. या प्रकरणाची दोन्ही बाजूंनी वस्तुनिष्ठ खात्री  करून योग्य ती चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रोटी येथील मंदिरात महिलांचे सक्तीने मुंडन केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्याचा दावा करत सात दिवसांत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यानंतर चाकणकर यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने या प्रकरणाला मोठा वादाचा रंग चढला.

या पार्श्वभूमीवर रोटी गावात तसेच व्यवसाया निमित्त बाहेर असलेले शितोळे देशमुख कुटुंबीय रविवारी दि. २८ रोजी एकत्र आले होते. यावेळी कुटुंबीयांनी निषेध सभा घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. जावळ विधी ही आपली पारंपरिक श्रद्धा असून त्यातून महिलांची बदनामी झाल्याचा आरोप करत सार्वजनिक माफीची मागणी ही यावेळी करण्यात आली. महिलांनीही या सभेत आक्रमक भूमिका घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या साऱ्या घडामोडींमुळे जावळ विधी प्रकरणावरून महिला आयोग आणि शितोळे ( देशमुख ) परिवार यांच्यात वाद अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी दि. २९ रोजा माजी आमदार रमेश थोरात यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

महिला आयोगाकडून पाठवण्यात आलेले पत्र, तसेच आयोगाच्या अध्यक्षा यांनी केलेली विधाने याबाबत थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शितोळे देशमुख  परिवारातील महिलांबाबत चुकीच्या पद्धतीने मांडणी झाल्याने त्यांच्या भावना दुखावल्या असून, याचा सर्वत्र निषेध होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रोटी येथे चालत आलेल्या पारंपरिक प्रथा व धार्मिक विधी भविष्यात ही सुरूच राहावेत, अशी ठाम भूमिका शितोळे परिवारातील महिलांची असल्याची माहिती थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे संबंधित अधिकारी व महिला आयोगाने याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व बाबी लक्षात घेऊन वस्तू निष्ठ चौकशी केली जाईल व त्यानंतर महिला आयोगाकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे..

पाच वर्षांपूर्वी, मी दौंड पंचायत समिती सभापती पदावर कार्यरत असताना, माझ्या मुलाच्या जावळ विधीच्या वेळी मी स्वतःच्या इच्छेने आणि पूर्ण स्वखुशीने केस अर्पण केले होते. या निर्णयासाठी माझ्यावर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडून दबाव, सक्ती किंवा बंधन टाकण्यात आले नव्हते, या मंदिरात काही महिला पाच केसांची बट स्विखुशो ने अर्पण करतात, जर आमच्या परिवारातील महिला आमच्या पारंपरिक देवाच्या विधीसाठी स्वखुशीने केस अर्पण करणार असतील तर त्यात कोणताही आयोग किवा कायदा आम्हाला अडवू शकत नाही. – आशा नितीन शितोळे, सभापती दौंड पंचायत समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *