मिलिंद शेंडगे
| बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
पाटस (ता. दौंड) पुणे–सोलापूर महामार्गावरील पाटस येथील पाटील चहा हातगाडीने गेल्या अनेक दशकांपासून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नाशिक, मुंबई, सोलापूर, अहमदनगर आणि औरंगाबादपर्यंत या चहाची ख्याती पोहोचली आहे. या लोकप्रियतेमागे पाटील चहाचे संस्थापक आणि मालक युवराज भगवान पाटील (जानराव) यांचे अथक परिश्रम, साधेपणा आणि ग्राहकांवरील प्रेम होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे थोड्याच वेळापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले असून पाटस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
युवराज पाटील यांनी सुमारे 35 वर्षांपूर्वी पाटील चहा हातगाडी सुरू केली. सुरुवातीला त्यांची गाडी पाटस बसस्टॉपजवळ महामार्गालगत होती. त्या काळात मुंबई–पुणे तसेच सोलापूर–नाशिक–औरंगाबादकडे जाणारे प्रवासी या ठिकाणी खास थांबून चहा घेत असत. महामार्गावरील पूल झाल्यानंतर जागा बदलावी लागली, तरीही चहाची लोकप्रियता मात्र कमी झाली नाही. आजही दूरदूरहून येणारे जुने ग्राहक “पाटील चहा कोठे आहे?” अशी विचारणा करून त्यांचा शोध घेतात आणि जुन्या आठवणी जागवतात.
पाटील चहाच्या गाडीवर अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्याचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांसह तालुक्यातील विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी येथे चहा घेण्यासाठी थांबलेले दिसतात.
ग्राहकांचे म्हणणे असे आहे की पाटील चहाचा आस्वाद घेतल्यावर ताजेतवाने वाटते, शरीरातील थकवा कमी होतो आणि काम करण्याचा उत्साह वाढतो. पाटस परिसरातील भीमा साखर कारखान्यातील कामगार वर्ग, तसेच इतर कामगार, दिवसातील थकव्यानंतर सर्वाधिक पसंती पाटील चहालाच देतात. पाटस येथे अनेक चहाच्या गाड्या असल्या, तरी पाटील चहाची चव, गुणवत्ता आणि वातावरण यामुळे ही हातगाडी आजही ग्राहकांनी गजबजलेली असते.
अहिल्यादेवी होळकर चौकातील पाटील चहाच्या गाडीवर नेहमीच राजकीय चर्चांपासून ग्रामस्थांच्या गप्पांपर्यंत विविध विषयांचा मेळ जमतो. चहाच्या सुरक्यांबरोबरच लोकांच्या आठवणी, राजकीय विश्लेषण आणि सामाजिक चर्चांचा रंग येथे सतत भरलेला दिसतो.
युवराज पाटील यांच्या निधनाने पाटस गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मेहनतीने उभे राहिलेले ‘पाटील चहा’ हे नाव आता एक परंपरा बनले असून पाटस परिसरात अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग राहिले आहे.
