| इंदापूर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील एका वयोवृद्ध नागरिकाची एटीएममध्ये फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र “या प्रकरणात वयोवृद्ध नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी प्रमोद यलमर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती इंदापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र बँकेच्या इंदापूर शाखेतील एटीएममध्ये ज्ञानदेव सोपान दरेकर हे आपले खाते तपासत असताना, त्यांच्या मागे उभ्या असलेल्या इसमाने त्यांच्या नकळत एटीएम कार्ड बदलले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून तब्बल ५० हजार रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरेकर यांनी तत्काळ इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. काही तासांतच पोलिसांनी प्रमोद यलमर या संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
