| दौंड : प्रतिनिधी
बिबीसीस्काय न्युज मराठीसाठी

यवत येथील  तणावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली जमावबंदी अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार मागे घेण्यात आली असून, यानंतर गावात शांतता व सलोखा प्रस्थापित करण्यासाठी यवत पोलीस स्टेशनमध्ये विशेष बैठक घेण्यात आली.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, स्थानिक पोलिस अधिकारी, पत्रकार, व्यापारी, व सामाजिक घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी व यवत पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सलोखा टिकवण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या माहितीनुसार, यवत घटनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातील एका गुन्ह्यामध्ये सोशल मीडियावर चुकीचा व भडकावू मेसेज फिरवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आरोपी गावातून पलायन केले असून, काहीजण मॉबमध्ये सक्रियपणे दिसल्याचे निदर्शनास आले आहे. ओळख पटवून त्यांच्यावर चौकशी सुरु आहे. याशिवाय, ज्या व्यक्ती थेट सहभागी नव्हते पण जमावात वावरताना आढळले, त्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

यवत शहरातील व्यवसाय, दुकाने पूर्ववत सुरू ठेवावीत, असे आवाहन पोलिसांनी व्यापारी व नागरिकांना केले आहे. गावात पुढील काही दिवस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

तसेच पंचक्रोशीतील गावांमध्येही शांतता बैठका आयोजित करून सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा भडकावू पोस्ट करू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.

शेवटी, समाजात शांतता व सलोखा टिकवणे ही सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.यावेळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *