| दौंड : प्रतिनिधी

  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दौंड तालुक्यात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, महसूल विभागाच्या विविध ऑनलाइन व डिजिटल सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, जेणेकरून शासकीय प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि प्रभावी होईल.

दौंड येथील महसूल विभागाच्या आढावा बैठकीस रजा राखीव उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे, दौंड तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार अतुल बोरकर, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, कार्यालयीन कर्मचारी व महा ई-सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

या बैठकीत ई-हक्क (E-Hakk), ई-फेरफार (E-Ferfar), ई-चावडी (E-Chavdi), ई-रेकॉर्ड (E-Record), ई-क्युजे कोर्ट (E-QJ Court), ई-ऑफिस (E-Office) या डिजिटल प्रणालींच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-हक्क पोर्टलवर आज अखेर १४,००० हून अधिक नोंदी दौंड तालुक्यात नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे नागरिकांना वारस नोंदी, अपात्र नोंदी कमी करणे, बोजा कमी करणे यांसारख्या सेवा ऑनलाइन स्वरूपात सुलभपणे मिळू लागल्या आहेत.

याचबरोबर ७/१२ उतारा, फेरफार व अन्य महत्त्वाचे महसूल अभिलेख लवकरच पूर्णतः डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या माध्यमातून महसूल प्रशासन नागरिकांसाठी अधिक पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे मत अतिरिक्त जिल्हाधिकारी मापारी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *