महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कवयित्रीची साहित्यिक भरारी, ‘पडसावल्या’तील कवितेची इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवड

| पुणे : प्रतिनिधी
   बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रात आपल्या संवेदनशील लेखणीने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या ‘पडसावल्या’ या काव्यसंग्रहातील ‘माय मराठी’ या कवितेची गुजरातमधील इयत्ता आठवीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नांदगावसह नाशिक जिल्ह्याच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाच्या ‘मराठी प्रथम भाषा’ आणि ‘मराठी द्वितीय भाषा’ या अभ्यासक्रमात ‘माय मराठी’ या कवितेला स्थान मिळाले आहे. संत तुकाराम महाराज, प्र. के. अत्रे, बाबा आमटे, बहिणाबाई चौधरी, राजा मंगळवेढेकर, जगदीश खेबुडकर, विठ्ठल उमप, उत्तम कोळगावकर आदी मान्यवर साहित्यिकांच्या साहित्यकृतींसोबत प्रतिभा खैरनार यांच्या कवितेची निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे.

ग्रामीण मातीतून साहित्यिक भरारी

प्रतिभा खैरनार यांचा साहित्यप्रवास ग्रामीण जीवनातील अनुभव, माणसांचे भावविश्व, सामाजिक वास्तव, स्त्रीमन, नाती आणि मातृभाषेवरील प्रेम या विषयांना केंद्रस्थानी ठेवून पुढे सरकत आहे. साध्या-सहज भाषेत जीवनातील वास्तव मांडण्याची त्यांची शैली वाचकांच्या मनाला भिडणारी ठरली आहे.

त्यांचा ‘तू मृगजळ जणू’ हा पहिला काव्यसंग्रह ८ मार्च २०२० रोजी महिला दिनाच्या निमित्ताने प्रकाशित झाला. त्यानंतर ‘बाभूळ फुलं’ हा कथासंग्रह १५ जानेवारी २०२३ रोजी, तर ‘पडसावल्या’ हा काव्यसंग्रह ३१ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित झाला. ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ हा त्यांचा काव्यसंग्रह १० एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित झाला.

माय मराठी’ आता गुजरातमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात

मराठी भाषेविषयी असलेली आत्मीयता आणि मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘माय मराठी’ ही कविता आता गुजरातमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग झाली आहे. गुजरातमधील इयत्ता आठवीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एका कवयित्रीच्या साहित्यकृतीला राज्याच्या सीमा ओलांडून शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळणे ही त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.

साहित्यकृतींवर पुरस्कारांची मोहोर

प्रतिभा खैरनार यांच्या विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय तसेच विविध साहित्यिक संस्था आणि प्रतिष्ठानांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

‘तू मृगजळ जणू’ या काव्यसंग्रहाला अनमोल पुस्तकालयचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, राज्यस्तरीय गिरणा गौरव प्रतिष्ठानचा स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार तसेच पुष्परत्न काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

‘बाभूळ फुलं’ या कथासंग्रहालाही पद्मगंगा फाउंडेशनचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, सूर्योदय समावेशक मंडळाचा गिरजा कथा कीर पुरस्कार, अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचा राज्यस्तरीय पुरस्कार, ॲग्रोवन न्यूज परिवार फलटणचा साहित्य पुरस्कार, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरचा प्रा. दिलीप बोढाले स्मृती पुरस्कार तसेच निर्मला मठपती उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

‘पडसावल्या’लाही साहित्यिक दाद

‘पडसावल्या’ या काव्यसंग्रहालाही स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, स्व. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था अहमदनगरचा बहिणाबाई काव्य पुरस्कार, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा साहित्य पुरस्कार, मातंग साहित्य परिषद पुणेचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाङ्मय पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगरचा सिद्धमाला ढगे स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’चीही विशेष दखल

‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ या काव्यसंग्रहाचीही साहित्यविश्वात विशेष दखल घेण्यात आली आहे. या संग्रहाला नारायण सुर्वे पुरस्कार, कै. जयश्री पाठक कविता संग्रह पुरस्कार, स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, ‘पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा’ राज्यस्तरीय पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार आणि शिवांजली साहित्य उत्कृष्ट काव्य पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

याशिवाय शिवबाबा वाघ प्रतिष्ठान पिंपळगाव जलालचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर सोलापूरचा काव्य पुरस्कार, साहित्यिक संभाजी महाराज पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा संत जनाबाई पुरस्कार २०२६, नरेंद्र विद्यापीठ संस्था कोल्हापूरचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार आणि मातोश्री रेखा गुरव साहित्य पुरस्कार अशा विविध सन्मानांनीही त्यांच्या साहित्यकृतीची दखल घेण्यात आली आहे.

कविता आणि कथालेखनातही ठसा

कविता आणि कथा या दोन्ही साहित्यप्रकारांत प्रतिभा खैरनार यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील बारकावे, सामाजिक प्रश्न, नात्यांची गुंतागुंत, स्त्रीजीवनातील अनुभव आणि माणुसकीची विविध रूपे प्रभावीपणे व्यक्त होतात.

एफ.वाय.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि व्यवसायाने ब्यूटीशियन असलेल्या प्रतिभा खैरनार यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातून ग्रामीण भागातील प्रतिभेला भौगोलिक मर्यादा नसतात, हे सिद्ध केले आहे.

नांदगावसाठी अभिमानाचा क्षण

विविध पुरस्कारांनी गौरविल्यानंतर आता त्यांच्या कवितेचा थेट शालेय अभ्यासक्रमात समावेश होणे ही त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे. नांदगावच्या मातीतून उमललेली प्रतिभा आता गुजरातमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमापर्यंत पोहोचली असून, ‘माय मराठी’च्या माध्यमातून मराठी भाषेचा अभिमान आणि साहित्याचा गंध नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.

प्रतिभा खैरनार यांच्या या साहित्यिक यशामुळे नांदगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *