| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
कुरकुंभ एमआयडीसी परिसरात धोकादायक रासायनिक पदार्थाची आवश्यक परवानगी, वैध कागदपत्रे व सुरक्षा नियमांचे पालन न करता वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे औद्योगिक परिसरातील धोकादायक रसायनांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर पोलीसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दौंड पोलीसांनि दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. ३० जुन रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ एमआयडीसीतील मधुमालती इंडस्ट्रीज समोरील रस्त्यावर पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी टाटा ट्रक (क्र.MH-12-HD-5106) संशयास्पदरीत्या रासायनिक पदार्थाच्या टाक्यांची वाहतूक करताना आढळून आला.
पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता चालक प्रकाश महाद साळवे (वय ४३ वर्षे ) रा. गजानन सोसायटी, दौंड याने ट्रकमध्ये मिक्स सॉल्व्हेंट असून ते कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फॉर्म येथून आणल्याची माहिती दिली. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) आवश्यक परवानगी, वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे तसेच धोकादायक रसायन वाहतुकीसाठी आवश्यक वैध दस्तऐवज त्याच्याकडे उपलब्ध नव्हते.
तसेच केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचे पालन न करता धोकादायक रसायनाची वाहतूक करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पर्यावरण तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस शिपाई अंकुश कृष्णा दळवी यांनी फिर्याद दिली असून, दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८६, २८७, मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९०(३), केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १२९, १३०, १३७ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार निकम यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार नगरे करीत आहेत.
