| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) आणि यवत पोलिसांनी बेकायदेशीर लिंगनिदान व स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत या प्रकरणातील आणखी एका महत्त्वाच्या आरोपीला अटक केली आहे.

सदिच्छा दिलीप शिंदे उर्फ सदिच्छा लक्ष्मण भोसले (वय 23) हिला अटक करण्यात आली असून, ती रॅकेटमधील प्रमुख सूत्रधार डॉ. संगीता गायकवाड यांची निकटवर्तीय सहकारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या मुख्य आरोपी डॉ. संगीता गायकवाड हिच्या चौकशीदरम्यान आणि तांत्रिक विश्लेषणातून सदिच्छा शिंदे हिची भूमिका समोर आली. ती गर्भवती महिलांशी संपर्क साधणे, त्यांना विविध ठिकाणी नेणे तसेच बेकायदेशीर लिंगनिदान प्रक्रियेत समन्वय साधण्याचे काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच ती बोगस डॉक्टर आण्णासाहेब गिरी याच्या संपर्कात असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

तपासानुसार, सदिच्छा शिंदे ही गर्भवती महिलांना डॉ. संगीता गायकवाड यांच्या शिंदवणी येथील फार्महाऊस तसेच सिताई हाके नगर येथील फ्लॅटवर आणत असे. या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपासणी केली जात होती. या संपूर्ण प्रक्रियेत शिंदे ही स्वतः सक्रिय सहभागी होती.

लिंगनिदानानंतर गर्भातील भ्रूण मुलगी असल्याचे आढळल्यास संबंधित महिलांना गर्भपातासाठी केडगाव येथील पार्थ हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

या अवैध गर्भलिंग निदानातून मिळणारी रक्कम आरोपी सदिच्छा शिंदे हिच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचा महत्त्वपूर्ण खुलासा तपासात झाला आहे. या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी संबंधित बँक खात्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, ती खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS), पूर्वगर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम (MTP Act) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटचा आर्थिक व तांत्रिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मयेने तसेच दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *